नागपूर आणि आसपासच्या जिल्यांमध्ये ‘एक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’चा प्रकोप; आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू, २० संशयित रुग्ण आढळले

नागपूर : नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि शेजारच्या मध्यप्रदेशात ‘एक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम (AES)’ या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांत या आजाराचे तब्बल २० संशयित रुग्ण आढळले असून आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये मध्यप्रदेशातील १०, नागपूर शहरातील २, नागपूर ग्रामीणमधील ३, भंडारा जिल्ह्यातील २, अकोल्यातील १ आणि गडचिरोलीतील १ रुग्ण यांचा समावेश आहे. यातून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला होता; परंतु आणखी एका बालकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेची (NIV) तज्ज्ञांची तीन सदस्यीय टीम नागपूरला दाखल झाली. या पथकाने मृत्यू झालेल्या भागांचा दौरा करून नमुने गोळा केले आहेत. अद्याप त्या नमुन्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. तसेच, जीएमसी, एम्स आणि इतर रुग्णालयांमधील डेटा संकलित करून रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाची (हिस्ट्री) तपासणी करण्यात येत आहे. काही रुग्णांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी सांगितले की, या आजाराचा परिणाम मेंदूवर आहे की नाही याबाबत अजून निश्चित निष्कर्ष निघालेला नाही. प्रौढ आणि बालक या दोन्ही गटांमधून अतिरिक्त नमुने घेण्यात आले असून, वायरोलॉजी टीमने मच्छरांचे नमुने सुद्धा तपासणीसाठी घेतले आहेत. या मच्छरांमध्ये एन्सेफेलाइटिस पसरवणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे.
अद्याप प्रयोगशाळेचे रिपोर्ट आले नसले तरी महाराष्ट्रात ४ आणि छिंदवाडा जिल्ह्यात ५ मृत्यू झाल्याची पुष्टी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, हे मृत्यू नेमके व्हायरसमुळेच झाले का, याबाबतचा अधिकृत निष्कर्ष अजूनही अस्पष्ट आहे.

