केरल एक्सप्रेसमधून आरपीएफची मोठी कारवाई! लावारिस ट्रॉली बॅगमधून 46 हजारांची विदेशी दारू जप्त

नागपूर : रेल्वे सुरक्षा दल (RPF) नागपूरने ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत सोमवारी एक मोठी कारवाई करत केरल एक्सप्रेस या गाडीतून तब्बल ₹46,410 किमतीची अवैध विदेशी दारू जप्त केली. ही दारू एका लावारिस ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवण्यात आली होती.
सोमवार, सकाळी सुमारे 11.45 वाजता केरल एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12626) नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दाखल झाली. त्या वेळी निगराणी ड्युटीवर असलेले आरपीएफचे आरक्षक लूनाराम टाक यांनी दुसऱ्या जनरल डब्याच्या मागे एक तपकिरी रंगाची लावारिस ट्रॉली बॅग पाहिली. संशयास्पद वाटल्याने त्यांनी आजूबाजूच्या प्रवाशांना विचारपूस केली. मात्र कोणत्याही प्रवाशाने त्या बॅगेवर मालकी हक्क सांगितला नाही.
यानंतर बॅग सीसीटीव्ही देखरेखीखाली आरपीएफ पोस्ट नागपूर येथे आणण्यात आली. बॅगेची तपासणी केल्यावर आत मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली. त्यात 100 PIPERS WHISKYच्या प्रत्येकी 750 मिली लिटरच्या 17 बाटल्यांचा समावेश होता. या सर्व बाटल्यांची एकूण किंमत सुमारे ₹46,410 एवढी आहे.
जप्त केलेली दारू पुढील तपासणी आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी फ्लाइंग स्क्वॉडच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी श्री. आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
रेल्वेमध्ये अशा प्रकारे अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे उघड झाल्याने रेल्वे सुरक्षा दलाने सतर्कता वाढवली असून, ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत येत्या काही दिवसांत आणखी कठोर तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.




