‘सोबत बसण्यास नकार दिल्याने’ वारांगनेवर चाकूने हल्ला; आरोपी फरार, परिसरात भीतीचे सावट

नागपूर: शहरातील कुख्यात गंगा-जमुना भागात पुन्हा एकदा गुंडांच्या दहशतीची घटना समोर आली आहे. केवळ सोबत बसण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तीन तरुणांनी एका वारांगनेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला वय 30 वर्ष असून ती गंगा-जमुना परिसरात तथाकथित देहविक्री व्यवसायात कार्यरत आहे. 5 ऑक्टोबरच्या रात्री ती आपला दिवस संपवून खोलीकडे परतत असताना 25 ते 30 वयोगटातील तीन तरुणांनी तिचा रस्ता अडवला. त्यापैकी एका तरुणाने तिला सोबत बसण्याची मागणी केली. मात्र, महिलेने ती मागणी नाकारताच आरोपी संतापला आणि त्याने धारदार शस्त्राने तिच्यावर तुटून पडत तिला जबर जखमी केले.
घटनेनंतर आरोपी आपल्या दोन साथीदारांसह दुचाकीवर बसून पसार झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यानंतर गंगा-जमुना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, लकडगंज पोलिसांकडून परिसरात कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, त्यामुळे गुंडांचा मनोबल वाढला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.


