“झुंड” चित्रपटातील कलाकार प्रियांशु क्षत्रियची जरीपटका परिसरात निर्घृण हत्या,वायरने बांधून आरोपीने चाकूने केले वार

नागपूर : सुप्रसिद्ध “झुंड” चित्रपटात भूमिका साकारणारा कलाकार प्रियांशु क्षत्रिय याची नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा परिसरात काल मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत आणि स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री साधारण तीनच्या सुमारास प्रियांशु क्षत्रिय वायरने बांधलेल्या अवस्थेत गंभीर जखमी स्थितीत आढळला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळविल्यानंतर जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या तपासात समोर आले की, प्रियांशु क्षत्रिय याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल होते आणि तो रेकॉर्डवरील आरोपी होता. त्याच्या बहिणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ध्रुप शाहू या संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे.
हत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.
या हत्येने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.




