गैरेजसमोर उभ्या गाड्यांना पेट्रोल टाकून लावली आग,घटना CCTV त कैद : पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, जुन्या वैमनस्यातून सूड काढण्यासाठी लावली आग

नागपूर – यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीतील विनोबा भावे नगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. जुन्या वैमनस्यातून सूड उगवण्यासाठी आरोपींनी गैरेजसमोर उभ्या गाड्यांवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीमुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर तातडीने यशोधरा नगर पोलिसांनी तपास सुरू करून केवळ काही तासांतच या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे, त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सांगितले की, गैरेज मालक आणि आरोपींमध्ये सुमारे दीड महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून आरोपींनी आपल्या साथीदारांच्या मदतीने मध्यरात्री हे कृत्य केलं.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी पेट्रोल टाकून गाड्यांना आग लावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी आरोपींकडून चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली मिळवली असून, पुढील तपास सुरू आहे.



