मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडे गांजा; धंतोली पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील एका कैद्याकडे गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रहिवासी यशवंत बाळू शिंदे (वय 38) हा पॉस्को गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. ६ ऑक्टोबर रोजी त्याला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातून परत आल्यानंतर सर्च सेलमध्ये त्याची तपासणी करण्यात आली असता त्याच्या हातात असलेल्या नॅपकिनमध्ये दोन पांढऱ्या प्लास्टिकच्या पुड्या आढळल्या. त्या पुड्या सेलोटेपने घट्ट बांधलेल्या होत्या.
जेंव्हा त्या पुड्या उघडण्यात आल्या, तेंव्हा त्यात सुमारे ४० ग्रॅम गांजा सापडला. कारागृह अधिकाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर धंतोली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
सदर प्रकरण हे पहिलेच नाही — अनेकदा कोर्टात हजर होणारे किंवा रुग्णालयात जाणारे कैदी बाहेरून नशेचे पदार्थ आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कारागृह कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या वेळेस आरोपीचा डाव फसला.
दरम्यान, हा गांजा कैद्याकडे कसा आणि कुठून आला, त्याला कोणी दिला, याचा तपास धंतोली पोलिसांनी सुरू केला आहे


