मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाज आक्रमक — नागपुरात आज महामोर्चा; विविध पक्ष व संघटनांचे नेते एकत्र येणार!

नागपूर : राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासकीय आदेशाविरोधात ओबीसी समाजात तीव्र नाराजी उसळली आहे. सरकारकडून ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल, या भीतीने ओबीसी समाज आक्रमक झाला असून, आज नागपूरात भव्य महामोर्चा काढण्यात येत आहे.
हा महामोर्चा सकाळी यशवंत स्टेडियम येथून प्रारंभ होऊन संविधान चौक येथे संपणार आहे. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकारने जारी केलेला जीआर (शासकीय निर्णय) रद्द करण्यात यावा, कारण या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. आरक्षण हे आमचे संविधानिक हक्क असून, त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांना वाहतुकीसंदर्भात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतून ओबीसी समाजाचे नेते व कार्यकर्ते नागपूरात दाखल झाले आहेत. विविध जिल्ह्यांतून आलेल्या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले असून, “ओबीसी हक्कांवर कुणाचा डंख चालणार नाही!” असे जोरदार घोषवाक्य दिले जात आहे.
राजकीय पातळीवरही या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांतील नेते या विषयावर आपले मत मांडणार असून, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.




