वाठोळ्यात उशीने तोंड दाबून 55 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या : परिचितांवर संशय, पोलिसांचा तपास सुरू

नागपूर : शहरातील वाठोळा पोलीस स्टेशन हद्दीतील सेनापती नगर भागात एका 55 वर्षीय महिलेची उशीने तोंड दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सुनीता मधुकर भोयर (वय 55) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोयर या आपल्या राहत्या घरात एकट्याच होत्या. दरम्यान, त्यांच्या मुलगा आणि सुने मुंबईहून घरी परतल्यावर घराचे दार उघडले असता त्यांना आई मृत अवस्थेत दिसून आली. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
वाठोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, प्राथमिक तपासात उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही हत्या कोणत्यातरी परिचित व्यक्तीने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीने घरात प्रवेश करताना जबरदस्तीचा कोणताही ठसा न सोडल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, या घटनेविषयी पोलिस उपायुक्त (DCP) निकेतन कदम यांनी सांगितले की, “घटनेचा सर्व अंगांनी तपास सुरू असून, गुन्हेगारांना लवकरच गजाआड केले जाईल.”



