WCL खदान मध्ये रहस्यमय मृत्यू : क्रेनखाली सापडला कर्मचाऱ्याचा मृतदेह; हत्या की आत्महत्या यावर गूढ

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाणे हद्दीतील वेकोलि (WCL) एकीकृत इंदर-कामठी डीप ओपन कास्ट खाणीत एका कर्मचाऱ्याचा मृतदेह क्रेनखाली सापडल्याने संपूर्ण वेकोलि क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख श्रीकांत रामकृष्ण नितनवरे (रा. उमरगाव, ता. उमरेड) अशी झाली आहे. श्रीकांत क्रेन मशीन चालक म्हणून या खाणीत कार्यरत होता.
ड्युटीदरम्यान घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत 9 ऑक्टोबर रोजी सेकंड पाळीत (शिफ्ट) ड्युटीवर आला होता. रात्री सुमारे 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान तो स्वतः चालवत असलेल्या क्रेनखाली त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने सहकाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी सुरू केली तपासणी
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.
सदर मृत्यू अपघाती आहे की आत्महत्या, की मग कोणीतरी हेतुपुरस्सर केलेली हत्या — याबाबत पोलिस सर्व अंगाने तपास करत आहेत.



