दोन गुन्हेगारांकडून दोन पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त, शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू

नागपूर : वाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेत असलेल्या आरोपींची नावे अल्केश गजभिये आणि पीयूष मळवंडे अशी असून, दोघांवरही यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिस हवालदार अजय पाटील यांना अल्केश गजभिये हा अवैध शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वडधामना येथील इस्माईल लेआउट परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. तपासादरम्यान त्याच्याकडून एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
चौकशीत अल्केशने कबुली दिली की, हे शस्त्र त्याने यशोदरानगर येथील समीर शेख उर्फ ‘येड़ा’ याच्याकडून विकत घेतले असून त्याने एक पिस्तुल आपल्या मित्राला पीयूष मळवंडे याला दिले आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनी शुक्रवारी परिसरात छापा टाकून पीयूषला अटक केली. त्याच्याकडून देखील एक पिस्तुल जप्त करण्यात आले.
दोन्ही आरोपींचा आपराधिक इतिहास लांबलचक आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पीयूषने प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय सुरू केला होता आणि दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने हे शस्त्र घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिस आता शस्त्र पुरवठादार समीर शेख उर्फ ‘येड़ा’ याच्या शोधात असून, त्याच्या संभाव्य ठिकाणांवर सतत छापेमारी सुरू आहे.




