गडकरीचा प्रशासनाला सवाल: चोवीस तास पाणी पुरवठ्याचे काय झाले? प्रकल्पाचा घेतला आढावा

नागपूर : नागपुरात चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. यातील काही जलकुंभांचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. तर काहींचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठ्याचे ट्रायल सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला विचारणा केली. प्रकल्पाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, ओसीडब्ल्यूचे सीईओ निलेश सिंग यांची उपस्थिती होती. एकूण ३२ जलकुंभांपैकी २९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. एका जलकुंभाचे बांधकाम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. तर इतर दोन जलकुंभांचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप ट्रायल सुरू आहे. या जलकुंभांना तातडीने कार्यान्वित करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल, याची काळजी घ्यावी. विशेषतः पुनापूर, भरतपूर या स्मार्ट सिटी परिसरांमध्ये चार जलकुंभांचे बांधकाम व कार्यान्वन लवकरात लवकर करावे, अश्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या.
डिक दवाखाना, नेताजी मार्केट, कॉटन मार्केट – टप्पा १, संत्रा मार्केट – टप्पा १, इतवारी बाजार आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या संदर्भातही गडकरी यांनी आढावा घेतला. या प्रकल्पांचे काम एमएसआयडीसीला दिले आहेत. यावेळी डिक दवाखाना आणि कॉटन मार्केटच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्याची माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये परिसरातील अधिकृत गाळेधारक, लीजधारक व परवानाधारकांना सामावून घेऊन पुढील प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



